डॉ बाबांच्या स्मृती 
१जुलै २०१९ 

डॉक्टर्स डे च्या सर्व डॉक्टरांना हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐 
माझे सासरे डॉ. बाबा अलूरकर यांचा आज जन्मदिवस. आज ते असते तर ९०दी गाठली असती !!💐💐💐💐 खरे डॉक्टर-पेशाने,विचारांनी!! 
व्यवसायात स्वतःचं संपूर्ण समर्पण आणि 'इदं न मम' या वृत्तीचं खरं खुरं साक्षात प्रतीक म्हणजे बाबा. परखड पण तितकेच स्वछं मनाचे असलेले आमचे बाबा. त्यांच्या वागण्या-बोलण्याने सुरुवातीला वाटलेला धाक आपलेपणात नकळत कधी परावर्तीत झाला कळलच नाही. खूप आठवणी आहेत त्यांच्याशी निगडीत! कधीतरी सविस्तर लिहायच्या आहेत. लातूर सारख्या ६०च्या दशकातल्या काळातल्या मराठवाड्यात असलेल्या एका छोट्या खेडेवजा गावात एक मोठ्ठ कार्य स्वसंकल्पनेतून उभारलेल्या आणि कुठलेही मान-सन्मान न स्वीकारलेल्या प्रचंड त्यागी वृत्तीच्या या अफाट असामान्य अनामिक अतिरथीला माझा कायमचा मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏🙏 

१जुलै २०२० 
कल्पवृक्ष कन्येसाठी.....
आज संपूर्ण जगात कोविडचा हाहाकार सुरु असताना डॉक्टर्स आणि वैद्यकीय सेवेचं महत्वं निराळं सांगण्यची अवश्यकता नाही. सर्व प्रथम वैद्यकीय सेवेतील सर्वांना मानाचा मुजरा🙏🙏 आज चा डॉक्टर्स डे आषाढी एकादशीला येण्याचा योग खूप काही सांगून जातो. आपली उत्तम सुरु असलेली प्रँक्टिस बाजुला ठेवून ज्या परिसरात अद्ययावत वैद्यकीय सुविधांचा अभाव आहे अशा खेडे वजा परिसरात एक सर्व सुविधांनी युक्तं असं हाँस्पिटल उभारण्याचा ध्यास उरी बाळगून,स्वान्त सुखाय जगणं सोडून,एक ध्येयाने प्रेरित असा डॉक्टर ६० च्या दशकात ध्यास आणि ध्येयपूर्तीसाठी अहोरात्र झटला,ते हाँस्पिटलच त्यांच प्रथम कर्तव्य होतं,त्याकरता प्रसंगी स्वतःच्या कुटुंबा पासून अनेक वर्ष दूर राहून जर्मनी सारख्या ठिकाणी काम करुन,तिथली पै न् पै वाचवून ती हाँस्पिटल साठी कारणी लावण्यात त्यांना जो आनंद मिळत होता तो कदाचित आपल्या कुटुंबाला सर्व सोयी-सुविधा देण्याच्या कित्येक पट जास्तं होता.अशी व्यक्ती म्हणजे माझे सासरे डॉ.रा.कृ.अलूरकर अर्थातच लातुर आणि परिसरातील सर्वांचे डॉ.बाबा अलूरकर,
याचा मला यथार्थ अभिमान आहे. आज बाबांचा जन्मदिन,ते आपल्यात नाहीत या गोष्टीला २४मे २०२० रोजी १३ वर्षं पूर्ण झाली,पण 'कल्पवृक्ष कन्येसाठी लावुनिया बाबा गेला' प्रमाणे त्यांनी लावलेला कल्पवृक्ष अनेकांना आज सावली देतोय,उन्हाचे चटके सहन करुनही त्या कल्पवृक्षाच्या फांद्यांना त्याच्या सावलीचा सार्थ अभिमान आहे. या हो बाबा एकच वेळा असं म्हणत पाणावलेल्या डोळ्यांना बाबांची सतत आठवण आहे. बाबांना आणि समाजाकरता आपलं स्वत्वं खर्ची करणा-या त्यांच्या सारख्या सर्वांना कोटी कोटी प्रणाम🙏🙏🙏🙏 

२४मे २०२१ 
आज बाबांना अर्थात डॉ. रामचंद्र कृष्णाजी अलूरकर आणि लातुरच्या विवेकानंद हाँस्पिटल चे मुख्यं संस्थापक डॉ. बाबांना या जगाचा निरोप घेवून तारखेने १४वर्षं पूर्ण झाली. हाँस्पिटल उभारण्याची संकल्पना त्यांच्या मनात मिरजेला वॉन्लेस हाँस्पिटल ला अँनेस्थेशिया विभागात काम करताना रुजली,त्याला एक घटना कारणीभूत ठरली- वॉन्लेस हे मिशनरी हाँस्पिटल असल्या कारणाने,सर्व डॉक्टरांनी मिळून जेंव्हा गणेशोत्सव करायचा ठरवला तेंव्हा त्यांना परवानगी नाकारण्यात आली आणि या तरुण-तडफदार आणि अतिशय धडाडी असलेल्या अशा तिशितल्या डॉक्टरच्या मनात एक बीज रुजलं-
हिंदू धार्मिक संकल्पनांना जिथे आडकाठी येणार नाही अस हाँस्पिटल उभारायचं- रुजलेलं बीज हळूहळू घट्ट झाल आणि त्यांनी मनोमन ठरवलं-
तो काळ होता ६०च्या दशकातला-भारतातल्या एखाद्या सोयी-सुविधांची वानवा असलेल्या ठिकाणी एक अद्ययावत हाँस्पिटल उभं करायचं. 
संघाची खूप घट्ट वीण या कुटुंबाशी आधी पासून होतीच-बाबांचे वडील हे त्या ब्रिटिश राजवटीच्या काळातले अत्यंत प्रामाणिक-लाच न घेणारे मामलेदार होते.सरकारी नोकरीत उच्चपदावर असल्याने,अलूरकरांच्या घरी झडती होणार नाही,म्हणून आदरणीय गोळवलकर गुरुजींनी काही दिवस पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यारता घरी मु्क्काम केला होता आणि बाबा आणि त्यांचे जेष्ठं बंधू डॉ. नाना अलूरकर हे जेंव्हा संघाचे कार्यकर्ते आहेत अस उघड झालं तेंव्हा आजोबांना सरकारी नोकरीत असल्याने,'माझी मुलं माझ्या नकळत हे सर्व करत आहेत आणि आता माझा आणि त्यांचा वडील-मुलगा हा संबंध नाही' अस लिहून द्यावं लागल़ं.किती वेदनादायी असेल हे!!पण समाजाकरता म्हणून त्याग सोसणं हे पिढीजातच आहे. 

संघाच्या माध्यमातून शोधमोहीम राबवून बाबांनी ठरवलं की भारताचा पूर्वोत्तर भाग किंवा औरंगाबाद सोडून मराठवाड्यातील एखादं छोटं गाव,आपण हाँस्पिटल उभारणीसाठी निवडायचं.अंतिम निर्णय -लातुर असा ठरला-ते ठरवण्यापूर्वी देखील त्यांच्या सांगलीहून लातुरच्या कमीतकमी ३०-४०फे-या झाल्या-तो काळ लक्षात घेतला तर तेंव्हा हे सगळं किती जिकिरीचं असेल हे लक्षात येत. १९६६साली अखेर स्वप्नं सत्यात यायला सुरुवात झाली. 
नंतर ७०च्या दशकात *केवळ आणि केवळ* आपल्या हाँस्पिटल ला आवश्यक असणारी आर्थिक बाजू भक्कम करण्या करता त्यांनी काही काळ जर्मनीत जावून तिथे अर्थार्जन करुन ती सारी पूंजी हाँस्पिटल मधील अद्ययावत उपकरणं आणि यंत्रसामग्री करता खर्ची घातली.जर्मनी ला ते एकटे गेले, तिन्ही मुलं,
बायको,वडील हे सारं कुटुंब मागे ठेवून तिकडे जाण्याचा उद्देश केवळ एकच-त्यांचं चौथं आणि सर्वात लाडकं अपत्यं अर्थात हाँस्पिटल-आर्थिक दृष्ट्या भक्कम करणं. यात त्या सा-या कुटुंबाचाच हा त्याग होता-चार वर्षांपेक्षा ही जास्तं काळ त्यांच्या मुलांना आपल्या वडिलांचा विरह झाला-हा त्या सगळ्या लिना-निलिमा-नचिकेत या चिमुरड्यांचा त्यागच होता.एक वर्ष फक्तं आई जावून तिकडे राहिल्या,तीन वर्ष इकडची बाजू समर्थपणे सांभाळणं हा त्यांचा खूप मोठा त्याग होता,उतारवयात ही हाँस्पिटल करता आपली सर्व पुंजी देणारे,दोन रुपयांचा हिशेब लागत नव्हता म्हणून रात्रं जागून काढणारे आणि हाँस्पिटल ट्रस्ट कसं उभारता येईल म्हणून मार्गदर्शन करुन त्यावर तळमळीने काम करणारे आजोबा-त्यांचा ही हा त्यागच होता,आपल्या बहीणीच्या मुलांचं बहीण लांब असताना सारं नीट व्हावं म्हणून मावशीने, तिची प्रकृती फारशी बरी नसताना वर्षभर राहून सारं करणं हा तिचाही त्यागच होता! 
हा सारा त्याग हाँस्पिटल आणि पर्यायाने समाजाकरता होता. जर्मनीतून परतताना आणि नंतरही काही वर्ष बाबांना तिथले जर्मन डॉक्टर परत तिकडे बोलावत असूनही त्यांनी कधीही त्यावर फेरविचार केला नाही,कारण आपल्या समाजाचं ऋण फेडणं हे त्यांना कायमच स्वकर्तव्य वाटत होतं. 
जर्मनीतही बाबा अतिशय काटकसरीने राहिले-प्रथितयश डॉक्टर असूनही ते तिथे पैसे वाचवण्याकरता सायकल वापरत. त्या काळात जेंव्हा आपल्याकडे चैनीच्या वस्तु अभावानेच मिळत,तेंव्हाही कुठल्याही महागड्या,चैनीच्या वस्तु त्या माया-वि्श्वात राहूनही त्यांनी कधीही विकतही घेतल्या नाहीत किंवा वापरल्या नाहीत,कारण एकच-आपल्या हाँस्पिटल करता शक्य तेवढा जास्तीतजास्त पैसा उभा करणं. नंतर कालचक्र फिरलं,आजोबा वृद्धापकाळाने गेले आणि आई अगदी कोणाच्याच ध्यानी मनी नसताना अचानक हे जग सोडून गेल्या, तो सगळ्यांनाच एक मोठ्ठा आघात होता ,बाबा तर मनाने कोसळलेच.
त्यांनंतर अनेक घटना घडल्या-त्याचे साद-पडसाद उमटले,उमटत राहिले आणि आम्ही पुण्यात भाड्याच्या छोटेखानी फ्लॅट मधे रहायला आलो.
बाबा-मावशी ही वर्षभराने आले,आले पेक्षा यावं लागलं. लातुरचा ऐसपैस बंगला विकला तेंव्हा पुण्यात एक फ्लॅट घेता आला इतपतच पुंजी या महान दिव्य व्यक्ती कडे होती. कारण अनेक वर्ष स्वतःचा स्वतः ठरवलेला पगार हा एका शिक्षका एवढा होता आणि नंतर काही वर्ष तर त्याच्याही निम्मा!!!
नंतर आजारपणात सेवा-शुश्रूषा करायला ही कोणी मदतनीस ठेवायला आर्थिक कारणास्तव त्यांनी नाकारलं!! खूप उदास असायचे,शारिरिक दुखणं हे एक कारण होतं,पण त्याहूनही अधिक खूप सारी व्यथा मनाच्या कोप-या-कोप-यात अव्यक्तं पणे साचून होती!! अगदी तान्ह्या नातीचं नवचैतन्य अजुबाजुला सतत असताना देखील संध्याकाळी अनेक वेळा त्यांच्या आरामखुर्चीत घरातले दिवे ही न लावता ते उदासपणे बसून राहायचे,जणू त्या बाहेरच्या प्रकाशाला त्यांच्या मनात थारा नव्हता!! या सा-या वेदना जरा हलक्या व्हाव्यात म्हणून शेवटची काही वर्ष बाबा खूप नाम-जप करायचे, आणि त्याने त्यांना बरं वाटायचं. शेवटी हा सात्विक रज, सात्विकते कडेच झुकतो हे अगदी खरयं. 
एका तिस-या व्यक्ती च्या दृष्टीकोनातून बघताना असं वाटतं की स्वान्त सुखाय जगणारं जग आणि भोवताल हा किती सुखी असतो,शेवटचा दिस गोड व्हावा म्हणून तर चाललेली सगळी धडपड असते,बाबा जर्मनीतच राहिले असते तर त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ कदाचित सुखी झाली असती का? 
पण तो त्यांचा पिंडच नव्हता! तसच कोणावर अन्याय करणं किंवा कोणावर झालेला अन्याय निमूटपणे बघणं हा ही त्यांचा पिंड नव्हता-शेवटी भगवद्गीतेत भगवानही हेच सांगतात आणि अगदी अलिकडचे स्वामी विवेकानंदही हेच सांगतात-अन्याया विरुद्ध लढा,अन्यथा तुम्हीही अन्याय करणा-या एवढेच अपराधी ठरता. हे जगन्नियंत्या आणि हे जगद्गुरु आम्हाला अन्याया विरुद्ध लढायला सतत बळ द्या,तरच आम्ही तुमचे खरे सुपुत्र म्हणवून घेण्यास पात्र होवू. 
वंदना नचिकेत अलूरकर-रिसोडकर 

१जुलै २०२१ 
INSTITUTIONAL MIND 
आज डाॅक्टर्स डे - सर्व जगभरातल्या डॉक्टरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🙏 
आज बाबांचा वाढदिवस असायचा,खूप साधेपणाने घरातच काहीतरी गोड-धोड करुन आणि संध्याकाळी औक्षण करुन तो साजरा व्हायचा. जन्मानेच डॉक्टर असलेल्या बाबांच्या एकंदर कामगिरीची निराळी ओळख करुन देण्याची नव्याने आवश्यकता नाही,पण आजच्या दिवशी एक घटना मात्र आवर्जून आठवते ती सांगाविशी वाटते. त्यातून एक ऐकलेली टर्म ख-या अर्थाने मनात रुजली, ती म्हणजे 'Institutional mind'.
काही वेळेला काही निर्णय जेंव्हा सर्वात जेष्ठं व्यक्ती च्या अपरोक्ष घेतले जातात आणि ते निर्णय घेतले गेल्याचं त्या व्यक्तीला नंतर दुसरीकडून समजतं तेंव्हा ती व्यक्ती दुखावली जाणं- तिला त्याचा प्रचंड मानसिक त्रास होणं साहजिक आहे. 
या संदर्भात एकदा बाबांना विचारलं- बाबा तुम्हाला या सगळ्याचा खूप त्रास होत असेल ऩ? - त्यावरच त्यांचं उत्तर माझ्या मनावर कायमचं कोरलं गेलं- 
ते म्हणाले-You need to have INSTITUTIONAL MIND. घेतला गेलेला निर्णय हा जर institute करता फायद्याचा असेल तर तो परस्पर घेतला गेला तरी त्यात आपण दुखावून जावू नये.तिथे तो परस्पर घेतला गेला यापेक्षा हितकारक घेतला गेला हे सतत लक्षात ठेवावं. 
किती मोलाचा संदेश होता तो आणि किती अमूल्यं शिकवण देणारा होता- आपण सतत आपले वैयक्तिक अहंकार-ego जपत,जोपासत जगत असतो, अनेक चांगल्या संस्थांमध्ये ही हे अनुभवायला मिळतं, हे जर कुठेतरी कमी झालं तर आज आपल्यात असलेली सर्वोच्च सर्वोत्तम शक्ती सारं जग अनुभवू शकेल आणि त्यातून खूप काही शिकु शकेल.बाबांना आजच्या दिवशी पुन्हा एकदा विनम्र अभिवादन,या सा-या शिकवणुकीतुन ते सतत आमच्यात आहेत.
🙏🙏🙏🙏🙏🙏 

१ जुलै २०२२ 
डॉक्टर्स डे च्या सर्वांना शुभेच्छा 💐💐 आज आमच्या आणि सा-या लातुर आणि परिसरातल्या सर्व आप्तेष्टांच्या बाबांचा जन्मदिन! 
बाबांनी उभारलेल्या कार्याविषयी निराळं सांगण्या-लिहिण्याची आवश्यकता नाही. 
आज विशेषत्वाने उल्लेख करावासा वाटतो तो अजून दोन व्यक्तींचा पहिले म्हणजे आजोबा - बाबांचे बाबा - सगळे त्यांना काका म्हणत असत. 
सांगली-मिरज आणि परिसरातील आपली सुखाची प्रॅक्टिस आणि तिथल्या सुप्रसिद्ध हाॅस्पिटल मधली नौकरी सोडून आपले चिरंजीव राष्ट्रकार्यात हातभार लावण्याच्या हेतुने (बाबांनी जेंव्हा कुठेतरी मागास भागात एक अद्ययावत हाॅस्पिटल सुरु करायचं ठरवलं,तेंव्हा ते खरोखरच अतिशय उदात्त हेतुने प्रेरित होवूनच ठरवलं होतं-हे मुद्दाम नमुद करावसं वाटतं-त्यात स्वतःकरता काही फायद्याचा तिळमात्र ही विचार नव्हता) एका दिव्य कार्याकरता झटत आहेत,हे कळल्यावर 'अतिशय स्वच्छं' असे मामलेदार म्हणून निवृत्त झालेले आजोबा- त्यांनी काय करावं- आधी छोट्याशा भाड्याच्या जागेत उभारलेल्या हॉस्पिटल ची स्वतः ची मालकीची अशी एक जागा असावी म्हणून जेंव्हा प्रयत्नं सुरु झाला,तेंव्हा आपल्या आयुष्यभर अत्यंत सच्चेपणा ने केलेल्या नौकरीतून हातात आलेल्या पेंशन ची सगळीच्या सगळी रक्कम त्यांनी त्या जागेकरता दिली.

त्यांच्या स्वहस्ताक्षरातल्या टिपांसह असलेल्या दासबोधाच्या काही प्रती अजुनही घरी आहेत.आधी मी फक्तं ऐकलं होतं की त्यांनी काही 'शे' वेळेला,दासबोध वाचला होता. त्या प्रती बघितल्यावर लक्षात आलं की नुसती पारायणं नाही तर ते तो दास'बोध' ख-या अर्थाने जगले होते.
मी त्यांना प्रत्यक्ष कधी भेटले नाही,पण त्यांच्या दासबोधातल्या टिपा आणि त्यांची ही कृती खूप काही 'भेट' देवून गेली. 
हाॅस्पिटलचा सगळा हिशोब चोख आहे नं हे रात्री बघण्याचं काम ही आजोबा अनेक वर्ष करत होते,त्यात एकदा काही पैशांचा ताळमेळ बसत नव्हता म्हणून संपूर्ण हिशोब परत परत तपासत रात्री उशीरापर्यंत ते बसले आणि हिशोबाचा ताळमेळ बरोबर लागल्या वरच तिथून उठले. 
हे फक्तं माझ्या पर्यंत आलेले काही प्रसंग आहेत. असे अजून कितीक असतील देवच जाणे,पण परमेश्वर मात्रं सगळ्याचा ताळमेळ ठेवून असतो हे निश्चित! 

दुसरी व्यक्ती म्हणजे माझ्या सासुबाई -आई. त्यांचा उल्लेख नं करता बाबांच्या कार्या विषयी लिहिणं अशक्यच आहे. खंबीर पुरुषाला एका अत्य़ंत धीरोदात्त अशा स्त्री ची साथ असल्या खेरीज अशा कार्यांची मुहुर्तमेढ रोवलीच जावू शकत नाही. 
बाबा आणि नचिकेत जेंव्हा पहिल्यांदा पुण्याला आम्हाला सर्वांना भेटायला आले तेंव्हाच त्यांनी अत्यंत अभिमानाने आई़ंचा उल्लेख केल्याचं मला अजुनही आठवतयं- ते म्हणाले होते- मी OT त किंवा इतर कामात व्यग्र असायचो त्यावेळी लोक मला पाच-दहा मिनिटं भेटून ऩंतर माझ्या पत्नीला भेटायला जायचे आणि जातांना आवर्जून म्हणायचे-बाबा तुम्ही कामात आहात आम्ही वहिनींना भेटतो! कारण त्यांना खात्री असायची वहिनींकडे आपण मोकळे पणाने बसु-बोलु शकतो. अशा आई या सर्व परिवाराच्या वहिनी होत्या आणि सर्वांची मोट घट्ट बांधून ठेवण्याचं कामही त्यांनी चोख केलेलं होतं. 
माझ्या करता दुर्दैवाची गोष्टं ही की मला त्यांचा सहवास हा असा त्यांच्याबद्दलच्या सगळ्या आठवणींमधूनच मिळाला. पण त्या होत्या तोपर्यंत बाबा आपल्या कार्यात पाय घट्ट रोवून उभे होते. त्या गेल्या आणि बाबा खचले ते कायमचेच.सगळं घरच खचलं. 
आमचे चिरंजीव जन्मल्यावर बाबांनी पुन्हा जरा उभारी घेतली होती.पण आजुबाजुच्या परिस्थितीची अव्यक्तं वेदना त्यांच्या चेह-यावर खूप स्पष्टं जाणवायची. ती वेदना आणि मनात रुतलेले कितीतरी सल २००७ साली ते जाईपर्यंत तसेच होते. खूपदा वाटायचं त्यांना बोलतं करावं,त्यांना म्हणावं आपण तुमच्या या सगळ्या कार्याविषयी एक छान पुस्तक लिहुया बाबा,पण तेंव्हा असलेली व्यस्तता आणि आवश्यक असलेल्या गोष्टींचा अभाव,
यामुळे ते शक्य नव्हतं.ईश्वरेच्छा बलियसी🙏🙏 

१ ऑगस्ट २०२३
अधिक श्रावण पौर्णिमा, विक्रम संवत २०८० 
या १ जुलैला आयुष्याच्या समुद्रात वादळातून जाणाऱ्या नौकेला सावरतांना काही व्यक्तं करण्याची इच्छा असुनही राहून गेलं! भावनांची तीव्रता असेल तर त्यांचा आवेग आपण थोपवू शकत नाहीत,याचा प्रत्यय आज येतोय……. 
जीवनाच्या आपाधापीत मनातले बाबा कधी विरणार नाहीत 
मन:चक्षुं वरले त्यांचे आठव कधी जिरणार नाहीत 
फिनिक्स वरमेल असे जिवंत होतील पर्णपटलांत 
आण साद देईल चकोरासम हर पूर्ण चंद्रकिरणांत 
साथ सारी सृष्टी होईल मम चातका पर्जन्याचे तुषार टिपण्या 
-वंदना नचिकेत अलूरकर 

१ जुलै २०२४ 
नेहमी प्रमाणे सर्वांना डॉक्टर्स डे च्या शुभेच्छा 🙏🏽💐 
आज १ जुलै आहे हे लक्षात यायला दुपार उजाडली, आणि मग एकदम मुलांना म्हटलं ‘अरे आज एक जुलै का!!?? तुमच्या आजोबांचा वाढदिवस असतो’ अस म्हणून नंतर ‘असायचा’ असं मीच करेक्शन केलं!! काळ काही कुणासाठी कधीच थांबत नाही, त्याचं अव्याहत वाहणं सुरूच आहे!! 

मला आजही अगदी स्पष्ट आठवतं- उशिरा उठलेलं बाबांना अजिबात आवडत नसे, त्याबाबतीत आमचे साहेब आणि बाबा ही दोन टोकं होती! 
मला वेळेत झोपले तर लवकर उठण्याची सवय होती, पण नचिकेत त्यामानाने उशिरा झोपायचा आणि मग उठायलाही उशीर व्हायचा, मग खाली गेलं की वातावरण एकदम tense असायच! एकदा बाबा म्हणाले, मी आता हॉस्पिटल मधे अर्धा तास लवकर जायला सुरुवात करणार आहे, तुम्ही दोघं त्यानिमित्ताने जरा लवकर खाली याल( बेडरूम वर आणि स्वयंपाकघर, हॉल सगळं खाली होतं), त्यानंतर मात्र मी कटाक्षाने लवकर उठून खाली यायला सुरुवात केली. 
बाबा जेवढे शिस्तप्रिय होते तेवढच हलकेफुलके विनोद करणं ही त्यांना अतिशय प्रिय होतं, एखाद्याचा बोलताना वारंवार वापरला जाणारा एखादा शब्द त्यांचे कान तत्परतेने टिपून त्यावर एखादा विनोद ही ते पटकन करून मोकळे होत असत! 
लग्नानंतर सुरुवातीला मला ultimate हा शब्द वापरायची सवय होती - पदार्थ ultimate झालाय पासून ते मूव्ही ultimate आहे अस सगळच जे काही फार आवडेल ते ultimate असायचं😊 
बाबांना माझ्या हातचे बटाट्याचे पराठे आणि साबुदाण्याची थालपीठं फार आवडायची, त्यांना विचारलं की सकाळी नाश्त्याला खायला काय करू, तर या दोन पैकी एक ते नक्कीच सांगायचे, त्यांच्या आवडीचा पदार्थ चवीने खायचे, एकदा मला मिश्किल तोंडाने म्हणाले ultimate झालाय पराठा, माझी तर कळी एकदम खुलली- आपण वापरतो तोच शब्द मुद्दाम योजून आज आपल्या एवढ्या महान सासऱ्यांनी आपल कौतुक केलंय या गोष्टीनेच मन मोहरून गेलं. 
खूप जण सांगतात की आई च्या अचानक झालेल्या विरहापूर्वी चे बाबा तर फारच बोलके आणि वेगळे होते……. 
खूप मजेत असले की मला soon बाई म्हणायचे, त्यांचा नातू अर्थात आमचे चिरंजीव हा त्यांना एक छान विरंगुळा होता - त्याला बाबा गाडीतून फिरवण, त्याला मांडीवर घेवून जोजावण आणि ‘ या बालांनो या रे या’ ‘ रानपाखरा रोज सकाळी’ म्हणत थोपटून ही जर लवकर निजला नाही तर ‘ dambis dambis राजाराम’ असं म्हणत थोपटणं, हे त्यांचे,त्यांच्या मनाला विरंगुळा देणारे क्षण होते. नंतर ऋजु चालायला लागल्यानंतर दररोज त्याला घेवून कृष्णाच्या मंदीरापर्यंत एक फेरी ठरलेली असायची - ‘चला बाळू …..’ या हाकेची बाळूही आतुरतेने वाट बघायचा! या सगळ्याने दोघांच्या नात्यातली वीण एकदम घट्ट झाली होती, मोकळा वेळ असेल तेव्हा एकमेकांबरोबर ते मजेत असायचे, लेकीला मात्र त्यांचा सहवास फारच कमी मिळाला! 

लातुरला असतांना त्यांच्या वरच्या खोलीतून एकदा जोरात ‘आ आई’ असा आवाज ऐकू आल्यावर मी धावतच खालून वर गेले,तर बाबा टीव्ही बघत होते, मी म्हटलं ‘बाबा कसला आवाज होता’, तर मला मिश्किल पणे म्हणाले ‘ काही नाही बघत होतो - असा आवाज आल्यावर कोणी धावून येतंय का ते’!!!
मी मात्र आवाक झाले, तोंडाने काहीच नं बोलता, ‘ काय बाबा’ अस हातानेच मुद्रा करुन दोन क्षण तिथेच उभी राहिले! अशी गुगली ही बाबा कधी कधी टाकायचे….. 

वंदना 🙏🏽🙏🏽

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

या फुलांच्या गंधकोषी ......मसाई पठारावरची नाजुक रानफुलं आणि अंतुऱ्याची फुलं

एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽