या फुलांच्या गंधकोषी ......मसाई पठारावरची नाजुक रानफुलं आणि अंतुऱ्याची फुलं

                                                 



                                                     
।।श्री।।

   यावेळच्या कोल्हापुर महालक्ष्मी आणि ज्योतिबा च्या दर्शना दरम्यान च्या प्रवासात दोन नाजुक आणि या आधी कधीही नं पाहिलेली फुलं दिठीस पडली! इथे दिठी हा माऊलींचा शब्दं आवर्जून योजावासा वाटला, इतकी ती फुलं नाजूक साजूक आणि गोड होती, की बघितली, दिसली, पाहिली यातलं काहीच म्हणावासं वाटलं नाही!                 

     रविवारी सकाळी कोल्हापूर पासून जवळ असलेल्या मसाई पठारावर रप्पस पाऊस आणि जोरदार वारा असतांना, चालतांना तिथली नाजूकशी पांढरी पांढरी एकटी दुकटी फुलं दृष्टीस पडली आणि एवढ्या पावसा पाण्यात आपलं अस्तित्व घट्ट टिकवून ठेवणाऱ्या या फुलांचा फोटो घेण्याचा मोह तेवढ्या जोरदार पावसात ही आवरता आला नाही! फोटो काढून झाल्यावर, फूल त्याच्या मुळासकट काढता येईल का म्हणून एक छोटासा प्रयत्न करून बघायला लागल्यावर लगेचच लक्षात आलं, की याची मुळं अतिशय दृढपणे पठाराच्या लालसर मुरमाड मातीला धरून आहेत, त्यामुळे त्या फुलाला फार त्रास नं देता, तो प्रयत्नं लगेच थांबवला - एका कुठल्यातरी बागेत लिहीलेलं वाक्यही आठवलं- फुलांशी प्रेमाने वागा, शिवाय कुठेतरी वाचलेलं- ऐकलेलं एक इंग्रजी वाक्यही झरकन आठवून गेलं - Don’t be rude to flowers…..कास पठारासारखीच या पठारावर ही फुलं येतात असं माझ्या दिराने सांगितल, आणि फुलांच्या हंगामात तिथे जाण्याची सुप्त इच्छा मनात डोकावून गेली….

     सोमवारी जिथे राहायला गेलो होतो, तिथून गाडीने जाताना, शेतांमधल्या छोट्याश्या कच्च्या रस्त्यावर समोर अगदी खाली एक फुलपाखरू होतं, आणि ते इतक रस्त्यालगत होतं, की कदाचित त्याला काहीतरी इजा होईल, असं वाटून, ऋजुला ( चिरंजीवांना) गाडी थांबवायला सांगून मी खाली उतरले आणि फुलपाखरा जवळ गेले, जशी मी जवळ गेले तसं ते उडालं, हायसं वाटुन, मी चार पावलं तशीच चालत पुढे गेले, तर रस्त्याच्या कडेला एका छोट्या झाडाची नाजूक नाजुक फुलं पडलेली दिसली, म्हणून कुतूहलाने दोन चार फुलं अलगद उचलून हातात घेतली, तिथेच दोघं जण उभे होते त्यांना फुलांचं नाव विचारलं आणि एका अगदी नव्या फुलाची माहिती समजली - अतिशय नाजुक असं फूल आणि त्याला अगदी सुयोग्य असा त्याचा मंद मंद दरवळ, मन अगदी प्रसन्न करुन गेला! जिथे राहिलो तिथल्या ही मुलाने पुढे माहिती दिली की अंतुऱ्याच्या झाडाचं लाकूड तिथे कुंपणाला वापरण्याची पद्धत आहे!         

     पठारावरचं रानफुल आणि अंतुरा या नाजूक नाजुक फुलांनी मनाचा एक कोपरा व्यापला, छोट्या गावांमध्ये हा किती सारा खजिना लपून आहे, आणि आपल्याला अनेक गोष्टींचं किती अगाध अज्ञान असतं याच वैषम्य वाटलं!! आपल्या माहितीत भर घालणाऱ्या त्या सगळ्यांचेच मनोमन आभार मानत फुलांची आठवण जपत आम्ही घरचा रस्ता धरला…….

Vandanaa 

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽

प्रिय नचिकेत,