एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽
आज ६ मे २०२४
हा दिवस मनावर कायमचा कोरलेलाच आहे,आणि या जन्मी तरी तो निश्चितच स्मरणात असेल! आजच्या दिवशी ४० वर्षांपूर्वी एक पुण्यात्मा परमात्म्यात विलीन झाला! आज तर माझ्या दृष्टिने हा फारच महत्वाचा दिवस आहे, मधे ही अनेकदा मनात आलं, जगाच्या दृष्टीने संपलेली तीनही सख्खी माणसं,आता कदाचित पुन्हा एकदा सुदूर अवकाशात एकमेकांना भेटली असतील, एकमेकांना बघून, ऐकून, बोलून,भेटून तृप्त झाली असतील !!??
४० वर्ष, १७ वर्ष आणि अजून काही महिनेच झालेली व्यक्ती यांची सांगड कशी घालता येते किंवा येते का, हा हिशेब तो एक जगन्नीयांतच जाणे !! पण पन्नाशी उलटल्यावर ही आईची तीव्र आठवण नचिकेत ला कित्येकदा आलेली मी बघत होते, वडिलांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात आलेल्या पाण्याला ही मीच साक्षीदार होते!! सगळं एकदम छान सुरू असतांना, आणि एका उत्तम हुद्द्यावर, उत्तम पगारावर, उत्तम देशात, अगदी - आज माझी west bay ला ११४ व्या मजल्यावर मीटिंग आहे वंदना - कुठला टाय आणि सुट घालू ते जरा सांग - अशा परिस्थितीत, नुसतच आई वडिलांना miss करण एवढच नाही, तर आपल्या मुलीत कुठेतरी आपली आई शोधणं, ‘काय हो साहेब, खूष आहात ना’ - यावरची एकदम अनपेक्षित प्रतिक्रिया - सगळं असलं तरीही आम्ही मुळापासून उखडलो गेलो वंदना, त्यामुळे विस्थापित ( रेफ्यूजी) असल्याची भावना कायमच मनात असते, ती काही जात नाही …..- असं म्हणणारा माझा नवरा....माझ्या वडिलांना नोकरी करत असताना आम्हाला ही ३,४ वेगवेगळ्या गावाना स्थलांतरित व्हावं लागलेलं,आणि त्यातलं एक गाव अत्यंत आवडतं, एक फारसं न आवडलेलं, हा भाग आम्हा भावंडांच्या ही बाबतीत होताच, पण नचिकेत ची ही भावना मात्र मला कळूनही वळण्यासारखी नव्हती. तो असं म्हणायचा तेव्हा पोटात ढवळून निघायचं आणि माझ्या परीने मी त्याला दिलासा देण्याचा प्रयत्न करायचे, पण डोंगरा एवढं दुःख माझ्या चणीत किती हलकं होणार, माझा प्रयत्न सच्चा आहे हे बघून तो ही कुठेतरी सुखावायचा आणी शांत व्हायचा!! हे आज लिहिण्या मागच कारण हे की, तो म्हणायचा - आई असती तर आज चित्र खूप वेगळं असतं!! कोण जाणे असतही कदाचित…. किंवा कसं , ते तो एक ईश्वरच जाणे !! पण उणीवा, जाणिवा आणि नेणीवा या आयुष्यभर सलतात हे प्रकर्षाने जाणवतं, ज्यांच्या बोथट झालेल्या असतात ती सगळी सुखीच म्हणायची!!
हे लिहायला घेतलं ते ५ तारखेला सकाळी ६ तारीख समजुन आणि त्यानंतर लक्षात आल्यावर, आता उद्या सकाळीच पूर्ण करू असं मनात म्हणत थांबवल,त्यानंतर संध्याकाळी नीलिमा शी - माझी पुण्यातली नणंद - बोलणं झालं तेव्हा तिने तिला पडलेल्या स्वप्नात आई आणि नचिकेत दिसल्याचं आणि दोघंही खूप आनंदात असल्याचं सांगितलं, मी मलाही असच जाणवल्याच तिला म्हणाले- या ज्या काही आपल्या देह, मन, बुध्दी आणि अहंकारा पलीकडल्या गोष्टी असतात त्या फार सूक्ष्म असतात, आपण विचारांनी तिथे पोहोचू शकत नाही, हे अनेकदा जाणवतं!! पुन्हा एकदा आईच्या पवित्र स्मृतीला अभिवादन आणि माझ्या कधीही प्रत्यक्ष न भेटूनही, सतत आठवांमधून भेटलेल्या सासू-आईला श्रद्धापूर्वक नमस्कार 
Vandanaa
६ मे २०२४
६ मे २०२१
आजच्या पवित्र तिथीला एक पुण्यवान तारा खळकन निखळला त्याला आज उणीपुरी ३७ वर्ष झाली. एका आईची उणीव तिच्या लेकरां करता कधीच भरुन निघत नसते आणि ती आई जेंव्हा डाॅ.बाबा अलूरकर यांच्या सारख्या महान आणि इदम् न मम या सेवावृत्तीने खरखुरं समाजकार्य उभारणा-या एका दिव्य व्यक्तीमत्वाची पत्नी आणि संपूर्ण विवेकानंद हाॅस्पिटल परिवाराची वहिनी या सा-या जबाबदाऱ्या पार पाडत असते तेंव्हा तर ही उणीव सतत जाणवत राहते.ती उणीव कधीकधी अनेक भेगा,खिंडारं पाडून अगदी त्या दिव्य व्यक्तीला ही नाउमेद करुन कायम ठसठसत राहते. मी लातुरला आले त्याआधी १२वर्ष,आई हे जग सोडून गेल्या होत्या पण सगळ्यांकडून त्यांच्याबद्दल खूपदा ऐकलं आणि घरातला त्यांचा फोटो ही इतका बोलका होता की त्या धीर द्यायला सतत आहेत असच वाटायचं. दोन प्रसंग आज इथे वर्णन करते एक मी प्रत्यक्ष अनुभवलेला आणि एक एका अतिशय मोठ्या आणि आदरणीय पोक्तं व्यक्ती समोर घडलेला तो त्यांच्याकडून ऐकलेला! लातुर वास्तव्यातील अगदी पहिल्या-दुस-या महिन्यातच संध्याकाळी आमच्या भल्या मोठ्या बंगल्यात एकटी होते आणि अचानक लाइट गेले,एरव्ही धीट असणारी मी मोठ्या घरात एकटेपणा वाटून कधी नव्हे तर जरा घाबरले. झटकन मेणबत्ती शोधून, लावली आणि हातात धरुन वळले,तर समोरच आईंचा फोटो होता आणि अगदी फोटोतून जणू त्या मला धीर देतायत असेच हावभाव वाटले,जणु काही त्या मला म्हणत होत्या - अगं मी आहे,घाबरु नकोस. मला त्यांनी कायमच धीर दिला, प्रत्यक्ष सहवासाची उणीव अशी अप्रत्यक्ष साथीतून काही अंशी भरुन निघे. दुसरा प्रसंग लातुरच्या प्रसिद्ध दत्तमंदिरात घडलेला. नचिकेत काही महिन्यांचा असताना त्याला,मुलींना आणि एक-दोन कर्मचा-यांना बरोबर घेवून आई दर्शनासाठी दत्तमंदिरात आणि नंतर मंदिरातल्या ताईंना भेटायला गेल्या. भेटून निघतानाचा हा प्रसंग- अगदी आपल्या मुलीसारखीच असणारी एक छोटीशी गोडंस मुलगी त्यांच्या बरोबर होती आणि तिने हट्टच धरला म्हणाली - काकु तु बाळाला दुस-या कोणाकडे तरी दे आणि तु मला उचलून घे. मला तूच उचलून घ्यायचस.आईंनी लहानग्या बाळाला कोणाकडे तरी सोपवलं आणि त्या धिटुकलीला उचलून कडेवर घेतलं आणि सगळे घरी निघाले.अशा या थोर माउलीने आपल्या अर्धवट वयाच्या लेकरांचा फारच अचानक आणि अगदी एखाद्या चित्रपटातला प्रसंग वाटावा अशा पद्धतीने निरोप घेतला,आणि तिची उणीव सतत ठसठसत राहिली अगदी थेट आजपर्यंत. माझ्या पुण्यात्मा असणा-या सासु-आईला आजच्या दिवशी ही विनम्र शब्दं-सुमनांजली


वंदना अलूरकर-रिसोडकर
ReplyForward |
नेहमी प्रमाणेच उत्तम लिहिले आहेस ! आम्हीही असं म्हणतो आई असती तर किती छान असतं आम्ही कमी भाग्यवान त्यामुळे इतक्या लवकर तिचं असणं संपलं! खरंच पूर्वीचा तिचा सहवास असतानाचा आनंदी काळ आठवला की वाटतं तो एक क्षणात हरवून कसा काय गेला?
उत्तर द्याहटवा