वारीची वार्ता 🌱🌱

                                                                 ।।श्री।।

           

                                   




                                    अधिक देखणे तरी निरंजन पाहणे।  
                                 योगीराज विनवणे मना आले वो माये ।। 

                                                       ….....

                                                       …........

    माऊलींची ही रचना गेले दोन तीन दिवस सतत मनात घोळत होती, वारीला जाऊन आल्या क्षणापासून, किंवा तिथे प्रत्यक्ष माऊलींची पालखी बघतांना, जे काही मनःपटलांवर उमटत होतं, त्यात ही रचना सुद्धा कुठेतरी नक्की असावी!! 

२५ जूनला आमच्या रिफील फिटनेस #RefillFitness च्या शरद केळकर सरांनी, जेव्हा ‘आपण refillers     ८ जुलैलै वारीला जाणार आहोत आणि लोणंद ते तरडगाव हा टप्पा पायी जाऊन तिथे रिंगण सोहळा बघून परत येणार आहोत, कोणा कोणाला यायचं आहे त्यांनी कळवा’ - असा मेसेज ग्रुप वर पाठवला, तो वाचला त्याक्षणी लगेच मनातून ‘मला’ असं उत्तर आलं, तरीही मनाला जरासा लगाम घातला आणि त्या दिवशी निश्चित करायला थोडा वेळ घेतला, कारण ५ तारखेला ८-९ जणं आणि ६ जुलै ला घरातच १५-१७ जण जमणार आहोत, ते आधी नीट पार पडु दे,असं मनात आलं, आणि त्यानंतर एकच दिवस मधे आहे, की लगेच ८ तारखेला ला सकाळी सकाळी निघावं लागेल!! पण वारीचा आयुष्यात मिळणारा पहिला वहिला अनुभव घ्यायला मन अधीर झालं आणि दुसऱ्या दिवशी ‘मला यायचंय’ असं कळवून मोकळी झाले!! 

५ आणि ६ जुलै ला घरातलं सगळं यथोचित पार पडलं, त्याची पूर्वतयारी आणि त्या दोन्ही दिवसांची सगळ्यांची उठबस, सगळं नीट पार पडलं,अगदी उरलेलं अन्नही लगेचच संध्याकाळी एके ठिकाणी जाऊन आम्ही देऊन आलो, तो ही अनुभव खूपच छान होता - त्यावर निराळं लिहिन……पण या सगळ्यात प्रचंड दमणुक झालेली जाणवली, पाय भयंकर ठणकत होते, यात शारीरिक थकवा किती आणि मानसिक किती हे तो एक परमेश्वरच जाणे …. मधे एकच दिवस होता आणि ८ तारखेला सकाळी वारीला आधी पुणे-लोणंद प्रवास, नंतर चालणं आणि पुन्हा परतीचा प्रवास असं सगळच होतं, फक्त एकदाच मनात आलं, की जाऊ की नको, पण त्यानंतर मात्र ‘ की नको’ उरलच नाही, फक्त ‘जाऊ' च ठरलं! 

आदल्या दिवशी जमेल तितकी तयारी केली आणि ८ च्या सकाळी ठरल्या वेळेआधीच आपोआपच जाग आली, भराभर तयार होऊन, मुलांना काही सूचना देऊन निघाले आणि ठरलेल्या स्थळी बरोबर वेळेत पोहोचले, आमच्या बहिणाबाई ही ठरल्या ठिकाणी आल्या, इतर ही सगळी मंडळी आली आणि ठरल्या वेळेपेक्षा ५-७ मिनिटं उशिरा बस निघाली! वाटेत नाश्त्या करता थांबलो त्या जागी माझ्या आवडीचे कच्चे लाल आणि पिवळे दोन्ही खजूर मिळाले, ते सर्वांना खाऊ घातले आणि तिथल्या परिसरात थोडे फोटो काढून आमची बस पुढे निघाली!

लोणंद ला एके ठिकाणी पोलिसांनी सगळ्याच गाड्या जायला रस्ते बंद केले होते, तिथे बस मधून उतरून आम्ही सगळे पायी वारी करता Refill Fitness च्या दोन banners सकट सज्ज झालो. मधे मधे रस्ता विचारत तरडगाव - चांदोबाचा लिंब या मार्गावर आमची वाटचाल सुरू झाली, आणि वेगवेगळ्या दिंड्या दृष्टीला पडायला सुरुवात झाली, अगदी पाऊस नसला तरी रस्ते आधीच्या पावसाने भिजलेलेच होते, एका मैदानात इतर दिंड्या जेवत होत्या,काहींनी तिथेच पथारी ही पसरून वामकुक्षी ची आपापली सोय केली होती. आम्ही तिथे वारकऱ्यांचे टिळे सगळ्यांच्या कपाळावर छापून घेतले आणि पुढे निघालो, थोडा पुढे एक सजवलेला रथ उभा होता, तो बघून, पुढे गेलो, चांदोबाचा लिंब पर्यंत आमची साधारण ७.३०-८.०० की.मी. ची मजल दरमजल यात्रा सुरु होती, तिथल्या छोट्याश्या मंदिरातलं दर्शन घेवून, एका लग्न-कार्यालयाच्या बागेच्या आवारात बसून, आणलेली जेवणाची शिदोरी खायची असं ठरवून, सर्वांनी पराठे आणि शिऱ्याचा आस्वाद घेतला आणि तिथेच थोडा वेळ विश्रांती घेतली. 

पालखी थोड्या वेळाने येईल, म्हणून आमच्यातले काही जण जरा पालखीच्या दिशेने चालत जाऊ म्हणून पांगले, इतरांनीही आता पुढे जाऊन पालखीची वाट बघूया असं ठरवलं आणि सगळेच मुख्य रस्त्यावर येवून उभे राहिलो. पायात नचिकेत चे शूज आणि मनात सतत स्वामींचे स्मरण करत मी ही पाय घट्ट रोवून उभी होते. त्यानंतर ही अर्धा पाऊण तास सहज गेला असेल,आणि वरती ड्रोन घिरट्या घालायला लागले, स्वयंसेवक - चला मागे सरा, येणाऱ्या दिंडीला जागा द्या अशा सूचना द्यायला लागले आणि पालखीच्या पुढच्या मानाच्या २७ दिंड्या एक एक करत २७,२६,२५, …..या क्रमाने पुढे पुढे सरकायला लागल्या......, 

एक एक दिंडी जसजशी पुढे जात होती, तसतसा भक्तीचा सागर एक एका लाटेने पुढे पुढे येतोय, मधेच एखादी लडीवाळ लाट, आपल्याला कुरवाळून हळूच पुढे सरकत्येय आणि तिची जागा अलगद पणे पुढची लाट घेतेय, असच वाटायला लागलं! दिंडीतला प्रत्येक वारकरी कुठल्याच भेदाभेदाचा पुसटसाही स्पर्श नसलेल माऊलीचं लेकरू वाटत होता, शेवटून तिसऱ्या आणि दुसऱ्या दिंडीच्या वेळी उत्सुकता शिगेला पोहोचली, माऊली चा रथ दिसायला लागला आणि सगळेच दर्शनाला अधीर झाले! क्रमांक एक ची दिंडी पुढे गेल्या वर अश्व डौलत आले आणि पुन्हा एक उत्साहाची सळसळती लहर सगळ्याभर दौडून गेली! पालखी वाहणारी वृषभांची उमदी जोडी आणि दृष्ट काढावी असे देखणे अश्वं, दौडत गेले मात्र…..त्यानंतर दर्शना करता जी काही झुंबड उडाली त्यात आमची मात्र दाणादाण उडाली आणि मी आणि माझ्या मैत्रिणींनी पालखीकडे न जाता मागे जाऊन उभं राहायचं ठरवलं, आणि आम्ही ५-६ जणी मागे जाऊन उभ्या राहिलो, घरून नेलेली तुळस हातात तशीच ठेवलेली होती, आणि समोरून जाणारी पालखी बघून, एकदम ‘ माऊली माऊली माऊली’ असं अनाहूत पणे मुखातून यायला लागलं आणि ते जे काही ‘ निरंजन’ दर्शन मिळालं, ते आठवून आजही मनात तृप्त तृप्त अनुभव येतोय!

आपण आणलेली तुळस, माऊलीने आपल्याला प्रसाद म्हणून परत दिलीये, अस मनात आलं आणि ती मुठीत कितीतरी वेळ तशीच ठेवली. त्यानंतर एका ठिंकाणी सगळे जमेपर्यंत थांबलो तेव्हा वरून अखंड पाऊस सुरू होता आणि समोरून पालखीच्या मागच्या दिंड्यांच्या रुपात भक्तीचा अलोट सागर लाटेमागून लाट येतच होता अखंड, अव्याहत …… पडणाऱ्या पावसाच्या रूपाने जणू माऊलीचा प्रेमवर्षाव सुरू होता, आणि समोरून जाणारा प्रत्येक वारकरी जणू आपण स्वतःच आहोत असं वाटत होतं- there is only one self - the supreme self and we all are nothing but part of that supreme self, even though every single Jeeva ( life) is a different entity, ultimately it is connected to the supreme self, हा अनुभव शब्दात नीट पकडता ही येत नाहीये, इतका तो अभूतपूर्व आणि अनुभूती जन्य आहे!! एकदा घेतला की पुन्हा पुन्हा घ्यावासा वाटणारा!!

मनाने तिथेच ठरवलं, पुन्हा यायचंच! खरंतर बस ला पुढे येता नं आल्याने, पुन्हा तेवढच अंतर उलट्या दिशेला चालावं लागणार होतं, त्यात पावसाने पूर्ण भिजायला झालेलं,पण एका वेगळ्याच शक्तीचा संचार अंगात जाणवत होता आणि त्यामुळे भराभर चालणही होत होतं, मधेच एके ठिकाणी थांबून सगळ्यांनी चहाचा आस्वाद ही घेतला, ज्यांना चालणं अगदी अशक्य झालं त्यांना, परतणाऱ्या वारकऱ्यांच्या टेंपोला विनंती करुन पुढे पाठवलं, सुदैवाने आम्हाला जरा एक दोन किलोमीटर कमी चालावं लागलं, रस्ते बस करता मोकळे झाल्याने पोलिसांनी बस ला पुढे यायची परवानगी दिली आणि आम्ही सगळे बस मधे बसलो, त्यातही सगळ्या बायकांनी कपडे बदले पर्यंत पुरुषांना खालीच थांबावं लागलं, अजून काही जण आले नव्हते म्हणून ही वाट बघून, ते सगळे आल्यावर बस परतीच्या वाटेला लागली!! हे सगळं होईपर्यंत ठरलेल्या वेळेपेक्षा बराच उशीर झालेला असल्याने, मधे थांबून सगळे जेवले आणि पुण्यात परत येईपर्यंत साधारण रात्रीचे ११ वाजले!! रात्री ११.३० पर्यंत सगळे आपापल्या घरी सुखरुप पोहोचले आणि वारीची सांगता झाली! 

एवढं चालणं, भर पावसात किती तरी तास उभं राहणं, प्रवास हे सगळं होवुनही दुसऱ्या दिवशी किंचितसे पाय दुखण्या पलीकडे काहीही त्रास झाला नाही!! जरी ऐन गर्दीमधली रेटारेटी झाली तरी कुठेही, वाईट किंवा घाणेरडा स्पर्श एकदाही जाणवला नाही, ही नक्कीच त्या तिथे संचारत असलेल्या शक्तिचीच किमया!!          ही रेटारेटी आणि लोकांनी टाकलेले खरकट्याचे ढीग, फेकलेली रॅपर्स यावर काही तरी निर्बंध आणता आला तर, भक्ती च्या या सागरात साऱ्यांनाच ते ‘अधिक देखणे तरी ‘….. खरोखरच निरंजन बघता येईल आणि अनुभूती ने चिंब भिजून, तृप्त तृप्त होऊन परतता येईल, पुन्हा पुढच्या वारीच्या आतुरतेच्या प्रतीक्षेत …….आणि मनाने ........

                                                पुरे पुरे आता प्रपंच पाहणे । 

                                                निजानंदी राहणे स्वरूपी वो माये।। 

                                               असं म्हणत …. 

राम कृष्ण हरी 🙏🏽🙏🏽🌷🌷 

वंदना 

टिप्पण्या

  1. फारच सुंदर लेखणी आणि अनुभव वंदना!!

    उत्तर द्याहटवा
  2. फारच सुंदर लेखणी आणि अनुभव

    उत्तर द्याहटवा
  3. मन भक्तिमय होऊन जणू तुझ्याबरोबर त्या अलोट भक्तीसागरात आल्याच आणि प्रत्यक्ष माऊलीची भेट झाल्याच स्वर्गसूख मिळालं. इतकं ओघवत लिखाण आहे कीं ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत चालतोय असा भास झाला 🙏🏿🙏🏿🙏🏿

    उत्तर द्याहटवा
  4. मन भक्तिमय होऊन जणू तुझ्याबरोबर त्या अलोट भक्तीसागरात आल्याच आणि प्रत्यक्ष माऊलीची भेट झाल्याच स्वर्गसूख मिळालं. इतकं ओघवत लिखाण आहे कीं ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणत चालतोय असा भास झाला 🙏🏿🙏🏿🙏🏿

    उत्तर द्याहटवा
  5. वा वा वंदना, छान शब्दरूप दिलेस आपल्या माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या टप्प्याला.

    उत्तर द्याहटवा
  6. आपली सहज सुलभ लेखन शैली आणि त्या बरोबरच आवश्यक तिथे ओव्यांचा आधार घेत अलंकारिक भाषेत लिहिलेले लेख त्या अनुभवाचा आस्वाद वाचकाला देवून जातात .
    धन्यवाद 🙏

    उत्तर द्याहटवा
  7. खूपच छान. अद्भुत अनुभव असतो. स्वसंवेद्य असा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽

प्रिय नचिकेत,