मनातला हिरवा चाफा
मनातला हिरवा चाफा 🌳
लहान असतांना शाळेला जाणारी वाट ही इतक्या सुंदर गोष्टींनी भरलेली होती की शाळेत जाता-येता रस्ता कधी संपायचा कळायचंच नाही!!
घरासमोरचं आईने स्वच्छं शेणसडा- रांगोळी घातलेलं अंगण, अंगणात कायम फुलं देणारी चांदणीची दोन झुडुपं आणि पेरुचं,बोरांचं, बिट्टीचं, पांढऱ्या चाफ्याचं अशी झाडं! नंतर जरा पुढे गेलं की उन्हाळ्याचे दोन महिने सोडल्यास कायम वाहती असलेली आमची उल्हास नदी, कर्जतला जातांना नदीवरच्या पुलावरुन आणि शाळेत जातांना नदीच्या बाजुने पुढे असं मज्जेत चालणं सुरु व्हायचं. नदी सोडून पुढे गेलं की,उजवीकडे दोन छोटी छोटी मंदिरं आणि डाविकडे अडुळशाच्या झुडुपांची रांग,त्यांची फुलं तोडून देठातला मध चाखण्यातला आनंद काही औरच, जरा चार पावलं पुढे आलं की वड आणि पिंपळाचे मोठ्ठे पार आणि दोन्ही अगदी गावाचे रक्षक असल्यासारखे मोठ्ठे वृक्ष, त्यांच्या सावलीतून पुढे आलं की विठृठल-रखुमाई आणि रामाच्या मंदिराचं आवार,ते मागे टाकलं की शाळेच्या वाटेवर असलेल्या एका घराच्या( मेढींचं घर) अंगणाच्या अगदी कोपऱ्यात एक हिरव्या चाफ्याचं बुटकसं झाड होतं, त्याला अगदी एखादा जरी चाफा लागला तरी त्याचा सूक्ष्मं दरवळ अगदी ५०-६० मीटर पर्यंत सुद्धा जाणवायचा आणि मनातच चुळबुळ सुरु व्हायची - ते चाफ्याचं फुल चोरण्याची😜,पण तिथे नेमका त्या घरातला एक गडी ( हरकाम्या) बसलेला असायचा आणि 'चोरांवर' लक्षं ठेवून असायचा,आम्ही अगदी ४थी-५वी त होतो, बरोबर मैत्रीण असायची,मग आमचा प्लॅन सुरु व्हायचा- फुल चोरण्याचा , पण तो मनुष्यं भिती वाटावी असाच होता आणि लहान मुलांनी येवून फुलं चोरुन नेवू नयेत म्हणून तो आणखीनच हातात काठी घेवून भीती वाटेल असा वाट बघत असायचा!!
मग मैत्रीण किंवा मी एक जण पुढे जावून हळूच आत वळून बघून अंदाज घ्यायचो,एक जण मागेच थांबायचं, जर 'ते भीती दाखवणारे काका' नसतील तर आमचा ५,७ प्रयत्नांमधला एखादा यशस्वी व्हायचा😉
मग काय आणि कित्ती आनंद व्हायचा काय वर्णावा!!
आणि तेवढ्यात जर ते काका आलेच तर तिथून धुम ठोकून सरळ घर गाठायचं आणि नंतर यावेळी फुल कोणी आपल्याकडे ठेवायचं हे ठरायचं- त्यातही ते तेलात घालून ठेवायचं की कसं, यावरही 'चर्चा' व्हायची! सोनचाफ्याच्या मानाने मंद सुगंध आणि जाड पाकळ्या असलेलं, आधी बरेच दिवस हिरवं आणि हळुहळू पिवळं होणारं हे फुल आम्हाला फारच 'कष्टं' करुन मिळवावं लागायचं त्यामुळे त्याची 'हिरवाई', त्याचा दरवळ आणि ते झाड मनाच्या कप्प्यात एक हिरवळ कायमची राखून आहे!!
आयुष्याच्या उन्हाळ्यात शांत शीतल आठवणी शब्दंबद्धं करुनही किती शीतलता देतात,अन् बालपणीच्या त्या दरवळाची आजही अनुभूती देवून जातात !! इतकं सुंदर बालपण देणा-या त्या परमात्म्याचं नं फिटणारं ऋण कायमचं आहेच!
🙏🙏
वंदना...आज तुझ्या लेखाने इथे पण हिरव्या चाफ्याचा सुगंध दरवळला...खरच भाग्यवान आहेस...अशीच व्यक्त होत रहा...
उत्तर द्याहटवाखूपच छान वंदना , सुरेख वर्णन लिहिले आहेस , दहीवली च्या सर्वच आठवणी अगदी nostalgic करून जातात .
उत्तर द्याहटवातुला हे सर्व अजून आठवते आहे , कमाल आहे , सलाम 👍