आज खऱ्या अर्थाने ....... १२. ११.२३
माझ्या सासऱ्यांना म्हणजे डॉ. बाबा अलुरकरांना जाऊन आता उणीपुरी १६ वर्ष झाली. २४मे २००७ ला त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यानंतर आम्ही सगळे लातूरला त्यांनीच स्थापन केलेल्या विवेकानंद हॉस्पिटल मध्ये जमलो होतो, ते त्यांचं सगळ्यात आवडतं बाळ होतं. तन-मन-धन सारच त्यांनी स्वप्रेरणेने आणि स्वकष्टाने उभारलेल्या हॉस्पिटल मध्ये ओतलं. दैवयोग हा कि त्यांची प्राणज्योत ही अखेर तिथेच शांत झाली,आणि त्यांच्या हि कैक वर्ष आधी आईची - त्यांच्या शरुची ही प्राणज्योत तिथेच मावळली.
बाब वारले आणि दोनच दिवसांनी नचिकेत चा वाढदिवस होता. २६ मे उजाडला, दुपारच्या जेवणाला आम्ही सगळे एकत्र बसलो आणि शेवटी सकाळ पासून थोपवून धरलेलं मी बोलून गेले - 'आज खरंतर नचिकेत चा वाढदिवस आहे', आमच्या महाराजांनी लगेच डोळे मोठ्ठे केलेच!!
तितक्यात नचिकेतच्या पुण्यातल्या आत्या - नलू आत्या म्हणजे रमा भट - या हि तिथे होत्या आणि खरंतर त्याच पुढाकार घेऊन सगळं करत होत्या. त्यांनाही जाऊन आता पाच-एक वर्ष झाली असतील. अत्यंत सात्विक आणि अध्यात्मिक अशा आत्यांचा सगळेच निरतिशय आदर करायचे, तर त्या क्षणाचाही विलंब न लावता म्हणाल्या - ' आता खऱ्या अर्थाने मोठा झालास नचु तु'!!
त्यांचं हे वाक्य माझ्या मनावर कायमस्वरूपी कोरल गेलय. माणसं जातात,पण त्यांचं बोलणं, काही विशेष वाक्य ही त्यांच्या रूपात आपल्या मनःपटलावर कायम कोरून ठेवलेली असतात. आत्यांना देवांची पूजा करतांना ही बघत राहावंसं वाटायचं, त्यांच्या कडे भेटायला गेल्यावर, त्यांचं दार उघडून आपल्याकडे स्मित करत बघणं आणि 'या' म्हणणं, त्यांचं आदरातिथ्य सारच विलक्षण होतं. त्यावर एकदा नक्की लिहायचं आहे.
आज मात्र त्यांचं,'खऱ्या अर्थाने मोठे झालात' हे वाक्य समजून, उमजून कृतीत आणण्याच्या प्रयत्नात............................
- वंदना
Vandanaa
संपला आधार झालो निराधार
उत्तर द्याहटवाशोधावा मग आपल्यातच आपण आधार
खरंतर वडील गेल्या नंतर पहिली भावना पोरकं झाल्याची असते. नंतर जबाबदारी ची जाणीव होते! 😢😢
उत्तर द्याहटवाखर आहे मैया माणूस वाक्यातून आणि कृतीतून जिवंतच असतो
उत्तर द्याहटवाखरं आहे. अलूरकर भावंडांशी आणि पुढच्या पिढीतील लीना , नीलिमा आणि नचिकेत शी माझे आगळेवेगळे नाते होते.
उत्तर द्याहटवा