गुढीपाडव्या चं 'श्री'खंड २२-०३-२३

बहुदा गुढी-पाडव्याला श्रीखंडाचा बेत असतो आमच्याकडे.
नाव वाचतांनाच त्यातल्या 'श्री' ची म्हणजेच शक्तीची 
चुणुक दिसायला लागते आणि तोंडाला पाणी सुटतं😋😋,
त्यात भरीला पुरी असली तर मग काय विचरायलाच
नको!
श्रीखंडासाठी लागणारा चक्का घरी करुन श्रीखंड करता 
आलं तर ते तर अगदी 'अमृतातेही पैजा जिंके' होतं,
आणि त्यात गम्मत म्हणजे चक्का बांधायचे थोडेसे 
कष्टं घेतले की मग त्याच चक्क्यात चक्कं श्री-,
आम्र-, अननस- असे कितीतरी अगणित *- 
प्रकार करता येवू शकतात. 
चक्का बापडा जे घालू त्याला समावून घेण्यात पटाईत 
असतो,बरं एकाच पदार्थातून निर्माण झालेल्या 
पक्वान्नांमधे उत्तम वैविध्य येतं,आणि रसना तृप्त होऊन 
खाणारा ढेकर देत आपल्याला मनोमन आशिर्वाद 
देवून मोकळा होतो.
श्रीखंडा ची  खासियत ही की केवळ महाराष्ट्रातच नाही 
तर गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तरेकडे सगळीकडेच हे 
प्रिय पक्वान्न आहे,आणि दक्षिणेतल्या प्रियजनांना 
प्रेमाने खावू घातलं तर त्यांना ही ते तितकच आवडतं.
आता त्याचा मुख्य घटक पदार्थ चक्क्याकडे जरा
वळुया.
चक्का हा तर अखिल भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय 
असा लोकप्रिय पदार्थ आहे.
त्याचं एक सगळ्यांना च माहिती असलेलं आणि हल्ली 
चक्क| च्या ऐवजी वापरात असलेलं नाव 
म्हणजे 'हंग कर्ड'😎 असं म्हटलं की एकदम 
'ग्रेट' वाटतं!!!!
तर हे हंग कर्ड म्हणजेच आपला चक्का,त्याला अरब 
देशांमध्ये लबनेए असं म्हणतात,म्हणजे चक्क्यात 
भरपूर मीठ घालून केलेला असा पदार्थ, usually 
ब्रेड वर लावून आणि विविध pickled 
म्हणजे मिठात खारवलेल्या इतर गोष्टींबरोबर याची 
चव फारच तुफान लागते. 
आपण घरीही करुन बघु शकतो,आता तर अनेक 
ठिकाणी पाककृती सहज उपलब्ध असते. 
या लबनेए बरोबर साधारण पिकल्ड बाळ-काकडी,
मुळा,गाजर असं आणि अजून एखादं डिप किंवा 
सॉस -आपण साधारण सॉस म्हणजे टोमॅटो चं असं 
जे समीकरण करून बसलेलो असतो,
ते इथे अजिबात लागू होत नाही, टोमॅटो चं असतं 
ते केचअप- असं आमची मुलंच आमच्या कडे एक 
खास कटाक्ष टाकुन आम्हाला सांगतात- काय वेडे
आहेत आपले आई-बाबा,असा त्या कटाक्षाचा 
अर्थ असतो,तर असो🙂
पुन्हा एकदा चक्क्या कडे वळुयात - याचाच आणखी 
एक भाऊ म्हणजे ग्रीक योघर्ट.
आम्हाला दोह्यात उत्तम आणि ताजं लबनेए मिळत 
असल्याने कधी ग्रीक योघर्ट च्या भानगडीत पडायची 
वेळ आली नाही,तसही ते बरेच आठवडे आधीचं 
असतं आणि माझ्या सद्सदविवेक बुद्धीला एवढं 
जुनं आणि ते ही दही-चक्का घेणं झेपत नाही.
तर असा हा जगद्विख्यात पदार्थ आपण 
नव-वर्षाची सुरुवात साजरी करायला संपूर्ण पणे 
घरी करुन एक उत्तम स्वास्थ्यदायी सुरुवात 
करण्याचा प्रयत्नं करतो ही खरंच खूप उत्तम 
कृती आहे.
श्रीखंड/आम्रखंड करतांना तो घरच्या दह्याचा,
बांधुन केलेला चक्का पातेल्यात काढलेला पाहून 
पहिली आठवण होते ती कान्ह्याची! 
एवढं घट्टं मुट्टं दही समोर असतांना त्याची 
आठवण नं होईलतरच नवल!! मग त्यात 
साखर घालून ते मिश्रण एकत्रं करतांना
त्यांचं एकमेकांशी एकजीव होणं म्हणजे 
जणु राधे-कृष्णच!! 
आपापली चव राखत, आपलं अस्तित्व दुस-यात
एकरुप करणं इथे शिकावं!! अहाहा!
साधं श्रीखंड असेल तर साखरे नंतर जोडीला 
येणारे जायफळ-वेलची--पिस्ता-केशर 
म्हणजे श्रीखंडाच्या ब्रजभूमीवर रास-क्रीडा 
करणारे गोप-गोपीच!!
आम्र-,अननस- इत्यादी असेल तर मग मात्रं 
या गोपाळांच्या ऐवजी आंबा,अननस यांची 
एक हाती सत्ता - जणु साखरेचं राधेपण आणि
चक्का-साखरेचं निखळ मैत्रं स्वीकारुन नाजुक 
तरीही भक्कम जोडीदार म्हणून 
साथ देणारी रुक्मिणी!!
एकुण असा पदार्थ झक्कं पैकी तयार होवून,
पानात येवून, पोटात कधी जातो आणि तृप्तीची
ढेकर कधी आणतो,हे आपलं आपल्याला ही 
नं उमगणार चक्कं कोडंच असतं,
म्हणूनच नाव बहुतेक चक्का पडलं असावं!! 😊
आज २२-०३-२३ ला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 
सहजच लिहावसं वाटलं ते पानावर आलं.
ब्लॉग करण्याचा प्रयत्नं आहे.
सद्गुरु स्वामी माधवानंद,विद्येची देवता श्रीगणेश 
आणि माता सरस्वती यांना सादर अर्पण 🙏🙏

                -वंदना नचिकेत अलूरकर 

टिप्पण्या

  1. उत्तम लेख. तुझ्या हातचे श्रीखंड कतारला आम्ही खाल्ले आहे. उत्तम करतेस एकदम.आता पुन्हा एकदा मला करून हवं आहे😀
    -नीलिमा

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

एका पुण्यात्म्याच्या पवित्र स्मृतीला सादर 🙏🏽🙏🏽

प्रिय नचिकेत,